डॉ. ऋजुता विनोद

Image

डॉ. ऋजुता विनोद (एक शोधयात्री)

माझी शोधयात्रा खरं म्हणजे विविध टप्प्यात झाली.

१) मी पुण्याच्या मुलींच्या भावेस्कूल शाळेत असताना - मला कोण व्हायचय? याचा अंदाज घेणारी मी

२)  एस्‌. पी. (सायन्स) कॉलेजमध्ये असताना मी डॉक्टर होऊ शकेन का? हे आजमावणारी मी

३) बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये मी पुढे कोणत्या शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचय? याचा विचार करणारी मी

४) मला कोणाशी लग्न करायचय? माझे सामाजिक अस्तित्व यापुढे कोणत्या नावाने असणार आहे? उपवर झाल्यावर पुढच्या गृहस्थाश्रमाचा विचार करणारी मी

५) विनोदांच्या घरी लग्न होऊन आल्यावर माझ्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडणारी मी

६) एम्‌.डी. झाल्यावर भूलतज्ञ हाच व्यवसाय मी करणार आहे का? याचा गंभीर विचार करणारी मी

७) समन्वयची व सनातनची आई झाल्यावर माझ्या व्यक्तिमत्वाचे नक्की किती भाग आहेत? मी कोणी स्वतंत्र व्यक्ती आहे की नाही याचा शोध घेणारी मी.

८) मानसज्ञ, निसर्गअभ्यासक, योग थेरपीस्ट, साहित्य-संशोधक, संस्था-व्यवस्थापक इतकी बहुविध कामे करूनही मी समाधानी का नाही? मला कोण व्हायचंय? या विचाराने कासावीस झालेली मी

९) ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग मनापासून अवलंबून, गुरुपीठामध्ये इतकी वर्षे वास्तव्य असूनही माझ्या हाती काही गवसत का नाही? म्हणून कावून जाणारी मी

१०) २००१ मध्ये वेल्लोरच्या केंद्रात कौन्सेलिंगचे विशेष प्रशिक्षण घेताना एक कौन्सेलर म्हणून मला सापडलेली मी 

११) सायकोथेरपीच्या वैयक्तिक अनुभवातून जाऊन "सर्व जगाच्या संबंधाने मी" असा माझा संपूर्ण नव्याने व शास्त्रशुध्द शोध घेतलेली व थेरपीस्ट म्हणून विशेष प्रशिक्षित व आत्मविश्वासयुक्त झालेली मी

१२) सायकोथेरपीस्ट म्हणून यशस्वी होतेय हे दिसल्यावर, मी व्यवसायाने कोण आहे? हा शोध थांबवलेली मी

१३) २००४ मध्ये भक्तिमार्गातून स्वतःचा पारमार्थिक शोध घ्यायला प्रवृत्त झालेली मी

१४) गुरुकृपेसाठी जिवाचा आकांत करणारी मी

१५) २००६ मध्ये सद्‌गुरुने पदरात घेतल्यावर पुनर्जन्म झालेली मी

१६) गुरुनिर्दिष्ट उपासना करताना देहबुध्दीचा पगडा कसा कमी होईल? या दिशेने सजगपणे प्रयत्न करणारी साधक मी

१७) सद्‌गुरुची एक अतिनम्र होऊ इच्छित असलेली सेवक म्हणून स्वतःची ओळख झाल्यावर स्वतःचा शोध थांबवलेली मी.

आता ब्रह्मचैतन्यमहाराजांच्या "श्रीरामनाम" नौकेत इतर साधकांप्रमाणेच एक सर्वसामान्य साधक म्हणून मी बसलेली आहे. नौका जेव्हा पार होईल तेव्हा होईल. महाराज ती पार करतील याची खात्री असल्याने मी निश्चिंत झालेली आहे.